रात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...
म. टा. प्रतिनिधी, नगर: रात्रीच्या वेळी वाहनांची वर्दळ कमी असलेल्या रस्त्याने एकट्याने दुचाकीवर जाणाऱ्यांना अडवून त्यांना लुटण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढू लागले आहेत. तालुक्यातील अंतरवाली शिवारात एका दुचाकीस्वाराला आणि तालुक्यातील फुंदे टाकळी परिसरात एका दुचाकी चालकाला लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी काल, बुधवारी शेवगाव पोलीस ठाण्यात व पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. अनिल दिगंबर पवळे हे मंगळवारी, २९ सप्टेंबरला रात्री नऊ वाजताच्या सुमारास शेवगाव तालुक्यातील अंतरवाली शिवार येथील रस्त्यावरून दुचाकीवर जात होते. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने पवळे यांची दुचाकी अडवली व त्यांना चाकूचा धाक दाखवला. तसेच पवळे यांच्याकडील २७ हजार रुपये रोख, मोबाइल, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, आधार कार्ड घेतले आणि पवळे यांची दुचाकी घेऊन चोरट्याने तेथून पळ काढला. या प्रकरणी पवळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात काल अज्ञात व्यक्तीच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाथर्डी तालुक्यातही दुचाकी चालकाला अडवून लुटल्याची घटना घडली आहे. पाथर्डी येथील माजलगाव येथे राष्ट्रीय महामार्गावरून अंकुश विनायक तौरे हे दुचाकीवरून चालले होते. फुंदे टाकळी शिवारात येताच तौरे यांचा दुचाकीच्या पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवर तीन व्यक्ती आल्या. या तिघांनी तौरे यांची दुचाकी अडवली व त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील सहा हजार रुपये, दोन मोबाइल व त्यांची दुचाकी घेऊन तिथून पळ काढला. २९ सप्टेंबरला रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी काल उशिरा तौरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात तीन व्यक्तींच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jkBYxh
No comments