अमरावती: संचारबंदीत देशी दारूची सुरू होती विक्री; पोलीस पोहोचले अन्
अमरावती/ : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. कठोर निर्बंध असतानाही, काही ठिकाणी दारू विक्री सुरू आहे. येथील अशाच एका दुकानात अवैध दारूविक्री सुरू असताना, स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुऱ्हा येथील वार्ड क्रमांक एकमधील आठवडी बाजारातील देशी दारूच्या दुकानाजवळच लागून असलेल्या गोदमातून दुकान मालक अवैधपणे करत होता. गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा मारला. देशी दारू आणि ३ मोबाइल फोन आणि रोख २२६० रुपये असा एकूण ४४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी कमलकिशोर बजरंगप्रसाद जयस्वाल (वय ५५), राजेश बजरंगप्रसाद जयस्वाल (वय ५२) आणि पवन ज्ञानेश्वर कोठेकर (वय २४, सर्व रा. कुऱ्हा ता. तिवसा) या तिघांनाही गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून, पुढील कारवाईसाठी कुऱ्हा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन व अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांचे आदेशानुसार, पोलीस उपनिरीक्षक विजय गराड, सुनील केवतकर, संतोष तेलंग, बळवंत दाभणे, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, संदीप नेहारे यांनी केली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tv7AFx
No comments