काय भुललासी वरलीया रंगा! एका शब्दावर गुंतवणूकदार भुलले, 'या' शेअरमध्ये झाली १५० टक्के वाढ
मुंबई : ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ।। या अभंगाची आठवण करून देणारी एका घडामोड भांडवली बाजारात घडली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले असून रेमेडिसिवीर, आॅक्सिजन या उत्पादकांच्या कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत. याला भुलून गुंतवणूकदार देखील अशा नावाच्या शेअर्समध्ये सरसकट गुंतवणूक करत आहेत. बिगर बँकिंग वित्त सेवा पुरवठादार असलेल्या 'बॉम्बे आॅक्सिजन इन्व्हेस्टमेंट' या कंपनीच्या शेअरमध्ये तीन महिन्यात तब्बल १५७ टक्के वाढ झाली आहे. १ फेब्रुवारी २०२१ रोजी 'बॉम्बे आॅक्सिजन इन्व्हेस्टमेंट' चा शेअर ९९६५ रुपये होता. यानंतर या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीचा शेअर तब्बल २४५७४ रुपयांवर गेला आहे. विशेष म्हणजे सोमवारी भांडवली बाजार कोसळत असताना 'बॉम्बे आॅक्सिजन इन्व्हेस्टमेंट' च्या शेअरला ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. चालू एप्रिल महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये १२० टक्के वाढ झाली आहे. १ एप्रिल २०२१ रोजी कंपनीचा शेअर ११२५५ रुपये होता जो आता २४५७४ रुपये झाला आहे. या शेअरमधील तेजीने गुंतवणूक तज्ज्ञ देखील हैराण झाले आहेत. कंपनीने २०१८ मध्ये नावात बदल केला. कंपनीची रिझर्व्ह बँकेकडे बिगर बँकिंग वित्त संस्था म्हणून नोंदणी आहे. ३१ डिसेंबर २०२० अखेर कंपनीचे उत्पन्न ५६.४६ कोटी आहे. त्यातील ४८.४४ कोटी हे वित्तीय मालमत्तामध्ये केलेल्या बदलांमुळे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अशा कंपन्यांच्या बाबतीत योग्य माहिती घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा असा असा सल्ला, अल्फा इन्व्हेस्टमेंटचे पार्टनर विशाल दोशी यांनी दिला. मागील काही दिवसांमध्ये विविध राज्यांमध्ये करोना रुग्ण वाढले आहेत. यामुळे काही राज्यांना आॅक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र कंपनीच्या व्यवसायाची खातरजमा न करता गुंतवणूकदारांनी डोळे बंद करून 'बॉम्बे आॅक्सिजन इन्व्हेस्टमेंट' च्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. दरम्यान, 'बॉम्बे आॅक्सिजन इन्व्हेस्टमेंट' या कंपनीच्या नावात आॅक्सिजन असल्याने गुंतवणूकदार या शेअरकडे आकर्षित झाले असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. 'बॉम्बे आॅक्सिजन इन्व्हेस्टमेंट' औद्योगिक वापराकरीता गॅस पुरवठा करत होती. मात्र ऑगस्ट २०१९ पासून हा व्यवसाय बंद केला असून बिगर बँकिंग वित्त पुरवठा क्षेत्रात कंपनीने विस्तार केला आहे. मात्र नावात आॅक्सिजन असल्याने गुंतवणूकदारांमध्ये कंपनीच्या शेअरचे आकर्षण वाढले आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3sxusmt
No comments