सुंभ जळाला तरी पीळ जात नाही ! प्रत्यार्पण रोखण्यासाठी नीरव मोदीचा आणखी एक प्रयत्न
लंडन : पंजाब नॅशनल बँकेच्या १३००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेला याने भारताकडे होणाऱ्या प्रत्यार्पणाला रोखण्यासाठी आणखी एक प्रयत्न केला आहे. भारताने केलेल्या मागणीवर ब्रिटन सरकारने दोन आठवड्यांपूर्वी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. मात्र या निर्णयाविरोधात नीरव मोदीने ब्रिटिश उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला १५ एप्रिल २०२१ मंजुरी दिली होती. त्यानंतर नीरव मोदीला भारतात कधी आणणार याची उत्सुकता सर्वांना विशेषतः बँकांना लागली होती. मात्र प्रत्यार्पणाला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. नीरव मोदीने कनिष्ठ न्यायालय आणि ब्रिटनच्या गृह सचिवाने दिलेल्या प्रत्यार्पणाच्या निर्णयाला यू.के उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. नुकताच त्याने या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. नीरव मोदीला भारताच्या सुपूर्द करण्याचा निर्णय २५ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हा न्यायालयाने दिला होता. या निर्णयावर यू .के च्या गृह विभागाने १५ एप्रिल रोजी शिक्कमोर्तब केले होते. भारतात आणल्यानंतर नीरव मोदीला मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. ऑर्थर रोड तुरुंगात एक विशेष सेल तयार ठेवण्यात आला आहे. मोदीला बराक क्रमांक १२ मध्ये असलेल्या तीनपैकी एका सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. ऑर्थर रोड तुरुंगातील बराक क्रमांक १२ हा अतिसुरक्षित समजला जातो. दरम्यान , फरार घोषीत करण्यात आलेल्या आणि प्रत्यार्पण प्रक्रियेत असलेला किंगफिशर समूहाचा प्रमुख उद्योजक विजय मल्ल्या, पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना भारतात परत आणणारच अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत दिली होती. आर्थिक घोटाळेबाज मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना भारतात कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सीतारामन यांनी अर्थसंकल्पी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत स्पष्ट केले. सध्या विजय मल्ल्या आणि निरव मोदी ब्रिटनमध्ये आहेत. तर फरार मेहुल चोक्सी अँटिग्वा येथे असल्याचे बोलले जाते.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3xxJvQR
No comments