मुंबईत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा; पोलीस, एफडीएचे २ ठिकाणी छापे
मुंबई: मुंबईत पोलीस आणि एफडीएने अंधेरीतील मरोळ आणि मरीन लाइन्स परिसरात छापे मारून २२०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या व्हायल जप्त केल्या आहेत. सर्व इंजेक्शन एफडीएकडे सोपवण्यात आल्या असून, ते हॉस्पिटल्सना देण्यात येणार आहेत. मुंबईत करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. करोना रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा सर्वत्र जाणवत आहे. ते मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धडपड सुरू आहे. दुसरीकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. साठेबाज रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शन चढ्या दराने विकत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्याचवेळी मुंबईत काही वितरकांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा करून ठेवल्याची माहिती खबऱ्यांमार्फत आणि एफडीएला मिळाली. त्यानुसार, पोलीस आणि एफडीएच्या पथकाने उपनगरांतील दोन ठिकाणी छापे मारले. पोलीस आणि एफडीएच्या पथकाने अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथे एका वितरकाच्या ठिकाणी छापा मारला. तेथून रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या २००० व्हायल्स जप्त करण्यात आल्या. तर न्यू मरीन्स लाइन्स येथेही एका वितरकाशी संबंधित ठिकाणीही छापा मारला. तेथून रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या २०० व्हायल जप्त केल्या आहेत. रेमडेसिव्हिर इंजेक्शनची परस्पर विक्री करण्यावर बंदी असताना, काही वितरकांनी त्याचा साठा करून ठेवला होता. पोलिसांनी हा साठा जप्त केला असून, एफडीएच्या ताब्यात दिला आहे. ते इंजेक्शन योग्य त्या ठिकाणी हॉस्पिटलना देण्यात येतील, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QJsVww
No comments