मुकेश अंबानींची ब्रिटनमध्ये गुंतवणूक; गोल्फ क्लब रिसाॅर्टची रिलायन्सकडून खरेदी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ब्रिटनमधील बकिंगहॅमशायर येथील कंट्री क्लब आणि स्टोक पार्क हे आलिशान रिलायन्स इंडस्ट्रीजने सुमारे ५९२ कोटी रुपयांना (५.७ कोटी पौंड) खरेदी केले आहे. हा परिसर जेम्स बाँडच्या चित्रपटांत झळकला होता. रिलायन्स सध्या मुंबईतील ओबेरॉय हॉटेल समूहामध्ये हिस्सा वाढवित आहे. त्यात आता ब्रिटनमधील या मालमत्तेची भर पडली आहे. गेल्या चार वर्षांत रिलायन्स समूहाने ३.३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली असून, त्यातील ८० टक्के तंत्रज्ञान, माध्यमे आणि दूरसंचार क्षेत्रांतील आहे. ब्रिटनमधील बकिंगहॅमशायर येथील एक हॉटेल आणि गोल्फ कोर्स रिलायन्सच्या ग्राहक आणि आदरातिथ्य विभागाचा भाग बनले आहेत, असे कंपनीच्या वतीने गुरुवारी रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. स्टोक पार्क लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. यांनी केलेली ब्रिटनमधली दुसरी मोठी गुंतवणूक आहे. सन २०१९मध्ये अंबानींनी हॅमलेज हे खेळणी उत्पादक आणि वितरक कंपनीला खरेदी केले होते. त्या पाठोपाठ आता स्टोक पार्कची खरेदी करण्यात आली आहे. गोल्डफिंगर (१९६४) आणि टुमारो नेव्हर डाइज (१९९७) या दोन बाँडपटांचे चित्रीकरण या ठिकाणी झाले होते. स्टोक पार्कमध्ये ४९ आलिशान बेडरूम आणि सूट आहेत. या ठिकाणी २७ होलचे गोल्फ कोर्स, १३ टेनिस कोर्ट आणि १४ एकरांत पसरलेले खासगी उद्यान आहे. या उद्यानाला ९०० वर्षांहून अदिक जुना इतिहास आहे. सन १९०८पर्यंत हे ठिकाणी खासगी निवासस्थान म्हणून वापरात होते.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3xlzWUZ
No comments