ads

Breaking News

सहकारी बँंकांच्या सभासदांना दिलासा; लाभांश वाटपाबाबत रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय

मुंबई : रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकाच्या सभासदांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सहकार क्षेत्रातील बँकांना लाभांश वाटप करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिला आहे. त्यामुळे सहकारातील लाखो सभासदांना लाभांश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लाभांश वितरणासंदर्भात गुरुवारी रिझर्व्ह बँकेने अध्यादेश जारी केला आहे. त्यात वाणिज्य बँकांवर लाभांश वाटपाबाबत निर्बंध कायम आहेत तर सहकारी बँकांना या निर्बंधातून मुक्त केले आहे. देशात करोनाची दुसरी लाट सुरु आहे. या लाटेने पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेपुढे संकट उभं केलं आहे. दुसऱ्या लाटेत करोना बाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. अशा या संकट काळात बँकांनी स्वनिधी आणि भांडवलाबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. आकस्मित तोटा झाल्यास तो सहन करण्याइतपत भांडवल प्रमाण राखून ठेवावे असा सल्ला आरबीआयने बँकांना दिला आहे. शेड्युल कमर्शिअल बँका अर्थात वाणिज्य बँकांना २०२०-२१ या आर्थिक वर्षात नफा झाला असल्यास त्यात केवळ ५० टक्क्यांपर्यंत लाभांश सभासदांना वितरीत करावा, असे निर्देश आरबीआयने दिले आहे. तर सहकारी बँकांना लाभांश वितरणाबाबत कोणतेही बंधन नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. समभागावर लाभांश ठरवताना बँकेच्या संचालक मंडळाने सध्याची बँकेची आर्थिक स्थिती, भविष्यातील भांडवलाचा आढावा घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय भविष्यात लागणारे भांडवल, तोटा झाल्यास करावी लागणारी तरतूद , सध्याची आर्थिक स्थिती आणि त्याचा नफ्यावर होणारा परिणाम या घटकांचा विचार करून लाभांश निश्चित करावा असे निर्देश आरबीआयने दिले आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाने राज्यामधील सहकार क्षेत्रातील लाखो सभासदांना दिलासा मिळाला आहे. सहकारातील बड्या बँकाकडून आता लवकरच लाभांश जाहीर केले जातील आणि त्याचे वितरण केले जाईल, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.


from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3xiH3xq

No comments