पुणे: विहिरीत आढळला होता तरुणाचा मृतदेह, तपासात धक्कादायक माहिती उघड
पुणे: फुरसुंगी येथील शेवाळेमळा येथे पोहताना मित्राची टिंगल करीत त्याला कठड्यावरून विहीरीत ढकलून दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहमान प्रशांत वणवे (वय ४६, रा. महादेवनग, मांजरी बुद्रुक) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रशांत वणवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रोहित प्रदीप कदम (वय २१, रा. मांजरी बुद्रूक) आणि सिद्धार्थ म्हासोळे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ एप्रिल रोजी शेवाळे मळा येथील विहरीत ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहमान, रोहित आणि सिद्धार्थ मित्र असून मांजरी बुद्रूक परिसरात राहायला आहेत. ७ एप्रिलला तिघेही मित्र शेवाळेमळा परिसरातील एका विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी रेहमान विहिरीच्या कठड्यावर उभा होता. अचानकपणे रोहितने त्याला विहीरीत ढकलून दिले. पायऱ्यावर पडून रेहमान पाण्यात पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाला. रोहित आणि सिद्धार्थने त्याला पाण्याबाहेर न काढता पळ काढला. घटनेबाबत कोणालाही माहिती होऊ नये, यासाठी सिद्धार्थने रेहमानचा मोबाइल फेकून दिला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रेहमान यांचा मृतदेह विहरीत आढळून आल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. ढकलून दिल्यामुळे रेहमान याचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक आर. एस. ढावरे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3strPC6
No comments