अमरावतीमध्ये लहान मुलांना धोका, सोशल मीडियावर पोस्ट होत होत्या 'चाइल्ड पोर्नोग्राफी'
अमरावती : सध्या कमी किंमतीमध्ये चांगले स्माटफोन हातात आल्याने काही लोक त्याचा गैरवापर करत असल्याचे चित्र आहे. अशात ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. अमरावतीमध्ये याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती येथील एका अज्ञात इसमाने लहान मुलाचे अश्लील छायाचित्र प्रसारीत केले आहे. ही बाब दिल्ली स्तरावर नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेसमोर आली आहे. त्या आधारे शहर पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात बुधवारी एका समाजमाध्यम वापरकर्त्यावर गुन्हा दाखल झाला असून सायबर पोलीस त्या वापरकर्त्याचा तांत्रिक पध्दतीने शोध घेत असल्याची माहिती आहे. अलीकडे समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेच समाजमाध्यमांवरसुध्दा नियंत्रण ठेवणारी यंत्रणा असून त्यांच्याकडून आक्षेपार्ह बाबींची वेळोवेळी नोंद घेतली जाते. दरम्यान, ही यंत्रणा आक्षेपार्ह बाबी ‘एनसीआरबी’ (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) कडे पाठवते. त्या आधारे एनसीआरबी संपूर्ण देशातील राज्यांना संबधित अहवाल पाठवतात. दरम्यान, अमरावतीत झालेल्या प्रकाराबाबत ‘एनसीआरबी’कडून महाराष्ट्र सायबर कार्यालयाला माहिती प्राप्त झाली आहे. त्यांनी अमरावती सायबरला ती माहीती पुरवली आहे. त्या आधारेच सायबर पोलिसांनी संबधित वापरकर्त्याविरुध्द माहिती तंत्रज्ञानाच्या कलम ६७(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर वापरकर्त्याने लहान बालकांचा अश्लील फोटो ३ मे २०२० रोजी समाजमाध्यमावरुन प्रसारीत केला होता. अल्पवयीन मुला-मुलींचे अश्लील छायाचित्र किंवा व्हिडीओ तयार करणे, प्रसारीत करणे किंवा पाहणे हे कृत्य म्हणजे गुन्हा आहे. त्यामुळेच हा गुन्हा दाखल करण्यात आला असून युजर आयडीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wLeO92
No comments