चंद्रपुरातील गोळीबार प्रकरणात पोलिस तपासात महत्त्वपूर्ण खुलासा
चंद्रपूर: शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी एका युवकावर बुरखाधारी व्यक्तीने बेछूट गाोळीबार केला होता. पोलिसांच्या तपासात टोळी यु्द्धातून ही घटना झाल्याचे समोर आले आहे. घटनेच्या २४ तासांच्या आतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने दोन आरोपींना गजाआड केले. तसंच बुधवारी आणखी एका आरोपीला बंदुकीसह अटक करण्यात आली. अंकुश वर्मा, अमित सोनेकर,चंद्रश उर्फ छोटू सुर्यवंशी असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. बल्लारपुरातील आकाश उर्फ चिन्ना अंदेवार हा रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये काही कामानिमित्ताने आला होता. त्याच्या पाळतीवर असलेल्या बुरखाधारी युवकाने त्याच्यावर गोळीबार केला. यात आकाशला तीन गोळ्या लागल्या. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याने पोलिस यंत्रणाही हादरली. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत हल्लेखोर आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरुन फरार झाले. आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात दोन पथक तयार करण्यात आली. तपासात या हल्ल्याची वेगळीच बाजू समोर आली. या घटनेचा संबंध एका वर्षांपूर्वी बल्लारपुरात झालेल्या सुरज बहुरिया या हत्याकांडाशी लागला. जखमी आकाश बहुरिया हत्याकांडात सामील होता. त्याच्यासह दहा जणांना पोलिसांनी तेव्हा अटक केली होती. सध्या आकाश जामीनावर बाहेर आला होता. त्याच्यावर बहुरिया टोळीच्या सदस्यांची नजर होती. तो रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये येणार अशी माहिती बहुरिया टोळीला मिळाली. त्यानंतर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी बेछुट गोळीबार करण्यात आला. पोलिसांच्या तपासात टोळी यु्द्धातून ही घटना झाल्याचं समोर आलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r87gMy
No comments