जळगावमध्ये नदीच्या पुरात तरुण बेपत्ता; अनेकांचे संसार उद्ध्वस्त
: जळगाव जिल्ह्यातील तालुक्यात सोमवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक घरांमध्ये आणि शेतांमध्ये पाणी शिरल्याने हाहाकार उडाला आहे. तालुक्यातील भागदरा, तळेगाव, तोंडापूर व ओझर या गावांमध्ये पाणी घुसल्याने मोठं नुकसान झालं आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने जामनेर तालुक्यात मदतकार्य करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. दरम्यान कांग नदीला आलेला पूर ( Flood News) पाहण्यासाठी गेलेला एक तरुण बेपत्ता झाला आहे. जामनेर तालुक्यातील काही गावांमध्येही पुराचे पाणी घुसल्याने नुकसान झालं आहे. काही ठिकाणी शेतांमध्ये पिके पाण्याखाली गेली आहेत. जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे उंबर नदीला पूर आला आहे. वादळी वाऱ्यामुळे भागदरा गावामधील अनेक घरांवरील पत्रे उडाले असून उंबर नदीचे पाणी भागदरा गावात शिरलं आहे. गावाजवळ असलेला तलाव देखील फुटल्याने गावात पाणीच पाणी झालं आहे. रस्ते देखील वाहून गेले आहेत. कांग नदीच्या पुरात तरुण बेपत्ता कांग नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नदीच्या काठावर गेलेल्या तरुणांचा पाय घसरल्यामुळे नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने दोनपैकी एक जण बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. शेख मुशीर शेख जहीर (वय ३२) असं तरुणाचे नाव आहे. या तरुणाचं शोधकार्य सुरू आहे. घटनेची माहिती तहसीलदार जामनेर यांना मिळताच मंडळ अधिकारी आर. के. चौधरी. व तलाठी शिवाजी काळे पोलीस हवालदार देशमुख यांनी नदीच्या काठावर येऊन माहिती घेतली. तोंडापूर येथील कांग नदीला आलेल्या पुरामुळे तोंडापूरसह जामनेरला जाणाऱ्या नदीला पूर आल्याने वाहतूक ठप्प होऊन गावकऱ्यांचा संपर्क तुटला आहे. तळेगावात अनेक संसार पाण्यात तळेगावसह परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नद्या-नाले भरभरून वाहू लागले आहेत. तळेगाव येथील नदीला पूर आल्याने बसस्थानक परिसरातील घरे व दुकाने पूर्णपणे पाण्यात गेली आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात देखील पाणी घुसलं आहे. तळेगाव, शेळगाव, कासली व सावरला परिसरातील शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. सुधाकर भिवसन हिवाळे, सुपडाबाई समाधान कांबळे, कडुबा कोळी तसंच मन्यार कुटुंबियांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या आहेत. बसस्थानक परिसरातील हॉटेल व दुकान पान टपऱ्या या देखील पाण्याखाली गेल्या आहेत. सावरला येथील महिलेला ॲम्ब्युलन्समधून जामनेर इथं रुग्णालयात नेत असताना तळेगावमध्येच अडकल्याने त्या महिलेला तळेगाव येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावं लागलं.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zOfpZY
No comments