ads

Breaking News

पालक मुलांसोबत कोविड केंद्रात राहू शकणार; BMC चा मोठा दिलासा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये करोना संसर्गाची लागण होऊन मुलांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची वेळ आली तर पालकांनी काय करायचे, हा प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहे. मात्र पालिका प्रशासनाने पालकांना दिलासा देत त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही जंबो कोविड उपचार केंद्रामध्ये केली आहे. ज्या पालकांना करोनाचा संसर्ग झालेला नसेल त्यांना काही अंतरावर तर, जे पालक बाधित असतील त्यांना संसर्ग झालेल्या मुलांसोबत राहता येणार आहे. मुलांची काळजी पालकांना वाटणे स्वाभाविक असल्याने त्यांची अस्वस्थता कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. बीकेसी, दहिसर तसेच मुलुंड करोना उपचार केंद्रामध्ये ही उपाययोजना करण्यात आली आहे. पालकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रतीक्षाकक्षामध्ये पाणी तसेच इतर काही महत्त्वाच्या सुविधांची उपलब्धताही करण्यात येणार आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील बालरोगतज्ज्ञांनी मुलांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यास सांगितले तर त्यांच्यासोबत एका पालकाला मुलांसोबत राहता येईल का, अशी विचारणा मुलांसाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या सदस्यांकडे सातत्याने होत होती. मुंबईमध्ये शून्य ते एकोणीस वयोगटातील ४८,२१९ जणांना करोना संसर्गाची लागण झाली आहे. मुलांमध्ये संसर्गाच्या संख्येमध्ये वाढ झालेली दिसून येते. शून्य ते नऊ वयोगटामध्ये १३,५१८ तर १० ते १९ या वयोगटामध्ये ३४,७०१ जणांना संसर्ग झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. राज्यात ही संख्या ६,८९,२२४ असून शून्य ते १० वयोगटात ही संख्या २,०७,०४८ तर ११ ते २० या वयोगटात ही संख्या ४,८२,१७६ आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38Powhl

No comments