विद्यार्थ्याला पहिल्या मजल्यावरून खाली उलटं लटकावलं, मुख्याध्यापकाविरुद्ध कारवाई
: उत्तर प्रदेशातील मिर्झापूरच्या एका शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून मुख्याध्यापकांनी शाळेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उलटं लटकावण्याची शिक्षा दिल्याचं समोर आलंय. या घटनेचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्यानंतर आरोपी मुख्याध्यापकांविरोधात कारवाई करण्यात आलीय. हा प्रकार मिर्झापूरच्या अहरौरातील सद्भावना शिक्षण संस्थेतील प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. दुसरीच्या वर्गात शिकणारा सोनू यादव हा विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत पाणीपुरी खाण्यासाठी गेला होता. मुख्याध्यापक मनोज विश्वकर्मा यांच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतर त्यांचा राग इतका अनावर झाला की त्यांनी मुलाच्या पायाला पकडून त्याला शाळेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली उलटं लटकावत धरलं. विद्यार्थ्यानं आरडा-ओरडा करत माफी मागितल्यानंतर मुख्याध्यापकांनी त्याला वर खेचून घेतलं. ही घटना कुणीतही कॅमेऱ्यातही कैद केली. हा प्रकार शाळेतील इतर विद्यार्थ्यांसमोर घडला. त्यामुळे इतर विद्यार्थीही धास्तावले असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. या घटनेचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आरोपी मुख्याध्यापकांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी रात्री या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी मुख्याध्यापकांना अटक केलीय. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी शिक्षकाविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली होती. प्राथमिक शिक्षण अधिकारी गौतम प्रसाद यांनी या घटनेला दुजोरा देत आरोपी मुख्याध्यापकांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती दिलीय. सोशल मीडियावरून ही घटना समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी प्रवीण कुमार लक्षकर यांनी या प्रकरणात लक्ष घातलं. तसंच संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यांनी आरोपी मुख्याध्यापकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले होते.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CvK0ga
No comments