अँटिग्वामध्ये परतताच चोक्सी बरळला! भारतीय तपास यंत्रणांवरच केला अपहरणाचा आरोप
नवी दिल्ली : पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार फरार उद्योजक मेहुल चोक्सीने थेट भारतीय तपास यंत्रणांवर आरोप केला आहे. चोक्सीला डॉमिनिका कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर तो पुन्हा अँटिग्वा अँड बार्बुडा देशात परतला आहे. त्यानंतर त्याने भारतीय तपास यंत्रणेवर अपहरणाचा कट रचल्याचा आरोप केला आहे. या घटनेने आपण हादरून गेलो असून आपल्या मनात भीतीने घर केलं असल्याचा दावा चोक्सीने केला आहे. वाचा : ''मी पुन्हा घरी परतलो आहे, मात्र जी घटना माझ्यासोबत घडली त्याचा मी विचारही करू शकत नाही. या घटनेने माझ्या मनात भीतीने घर केले आहे, मला प्रचंड धक्का बसला आहे, माझा उद्योग व्यवसाय बंद करून आणि माझी संपत्ती जप्त करून देखील भारतीय तपास यंत्रणाही माझ्या अपहरणाचा प्रयत्न केला या विचाराने मी हादरून गेलो आहे'', असे मेहुल चोक्सीने म्हटलं आहे. पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी भारतातून पळून गेल्यानंतर २०१८ पासून अॅंटिग्वा अँड बार्बुडा या देशात लपून होता. मे महिन्यात तो अॅंटिग्वामधून अचानक बेपत्ता झाला होता. मात्र त्याला डॉमिनिका देशात बेकायदा प्रवेश केल्याबद्दल २३ मे २०२१ रोजी पकडण्यात आले होते. यावेळी त्याने आपले काही लोकांनी अपहरण केल्याचा दावा तुरुंगातून केला होता. चोक्सीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यात त्याला मारहाण झाली होती. त्याच्या जीविताला धोका असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी डॉमिनिका कोर्टात केला होता. मेंदूच्या आजारांवर उपचार करणारे तज्ज्ञ डाॅक्टर डॉमिनिकामध्ये उपलब्ध नसल्याने त्याला अँटिग्वा अँड बार्बुडामध्ये परत पाठवण्यात आले आहे. चोक्सीला डॉमिनिकन पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची तब्बेत बिघडली होती. त्याला त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेहुल चोक्सीच्या अटकेच्या वृत्तानंतर भारतीय तपास यंत्रणांकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र यात कायदेशीर अडचणी असल्याने त्याचे भारताकडील प्रत्यार्पण रखडले आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3wIHAHv
No comments