रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे ठप्प
रत्नागिरी : राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्व नदी-नाले, तलावं आणि धरणं ओसांडून वाहत आहेत. सततच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. याच मुसळधार पावसाचा फटका आता कोकण रेल्वेला बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. गोवा-करमली येथील बोगद्यात दरड कोसळली असून सकाळपासून कर्नाटक-केरळमध्ये जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाश्यांचेही हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे गाड्यांचं वेळापत्रक खोळंबलं आहे. काही गाड्या या वेगळ्या मार्गांवरून वळवण्यात आल्या आहेत. रुळांवरील पाणी आणि दरड बाजूला करण्याचं काम सुरू असून रेल्वे केव्हा पूर्वपदावर येणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. रत्नागिरीमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नद्यांना पूर आला असून नजिकच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी अर्जुना नदीमध्ये रायपाटण गांगणवाडी येथून विजय शंकर पाटणे वय.70 रा. खेड हे वाहून गेले आहेत. नदी पात्रामध्ये शोध मोहिम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. संगमेश्वर व लांजा परिसरात अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. राजापूर शहरातही पुन्हा पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर वाढत असल्यानं राजापूरमधील अर्जुना व कोदवली या नद्यांना पुन्हा पूर आला आहे. मुख्य चौक असलेल्या जवाहर चौकाला पाण्याचा वेढा बसला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. पोलीस, नगरपरिषद प्रशासन २४ तास सतर्क झाले असून परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. सलग धो-धो कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्याला झोडपले आहे. यामुळे भारजा, जगबुडी, वाशिष्ठी, बावनदी, काजळीसह अर्जुना नद्यांनी पाणी पातळी ओलांडली असल्यानं किनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UXFu9y
No comments