मुंबई दुर्घटना अपडेट : मृतांचा आकडा ३० वर, ८ जखमी; अनेकांचे संसार उद्धवस्त
मुंबई : मुंबई आणि परिसरात दरडींखाली राहाणाऱ्या रहिवाशांसाठी शनिवारची रात्र काळरात्र ठरली आहे. बेफाम पावसामुळे दरडी कोसळण्याच्या आणि घरांच्या पडझडीच्या चेंबूर, विक्रोळी, भांडुप, चांदिवलीत मध्यरात्री एकापाठोपाठ चार दुर्घटना घडल्या. त्यात अनेकांचे संसार मातीमोल झाले. चेंबूर वाशीनाका येथील दुर्घटनेत १९, विक्रोळी सूर्यनगरमध्ये १०, भांडुपला एक असे एकूण ३० जणांचे बळी गेले तर आठ जण जखमी झाले आहेत. चेंबूर आणि विक्रोळीत रात्री उशिरापर्यंत माती आणि चिखलाचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. चेंबूर, वाशीनाका येथील भारत नगर हा डोंगरावरील भाग आहे. येथील बंजारा तांडा वस्तीवर मध्यरात्री एकच्या सुमारास डोंगरावरील दरड संरक्षक भिंतींवर येऊन कोसळली. त्यामुळे या भिंतीलगत असलेली सहा घरे दरडीखाली खचली गेली. या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये नऊ महिला, चार पुरुष तर एका लहान मुलाचा व दोन अनोळखी नागरिकांचा समावेश आहे. जखमींवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. या दुर्घटनेत १४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफने कोसळलेली दरड, मातीचा चिखलयुक्त ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. तत्पूर्वी स्थानिक रहिवाशांनी बचावकार्य सुरू केले होते. दरम्यान दुर्घटनेनंतर या भागातील २० ते २५ कुटुंबियांना याच परिसरातील एमएमआरडीएच्या प्रकल्पग्रस्त वसाहतीत हलवण्यात आले असून आणखी काही कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. पूर्व उपनगरातील विक्रोळी पश्चिम येथील सूर्यनगर ही देखील डोंगराळ भागातील वस्ती असून मध्यरात्री अडीचच्या सुमारास येथील पंचशील नगरमधील सहा घरांवर दरड घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. डोंगराळ भाग असल्याने घटनास्थळी वाहने जाण्यास अडचण होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दल व पालिकेच्या यंत्रणेला ढिगारा उपसण्याच्या कामात मोठी मदत केली. दुसरीकडे भांडुप पश्चिम येथील कोंबडगल्ली, अमर कोर विद्यालयाजवळच्या एका चाळीत पहाटे साडेचारच्या सुमारास घराच्या भिंतीचा भाग पडला. या दुर्घटनेत सोहम महादेव थोरात (१६) हा मुलगा ठार झाला आहे. त्याला नजीकच्या अग्रवाल रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. पवई, चांदिवली परिसरातील संघर्ष नगर, इमारत क्रमांक १९ येथे सकाळी सहाच्या सुमारास दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने नजीकच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी चेंबूर वाशीनाका येथील दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली. 'पालिका दरवर्षी दरडीजवळ तसेच धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दुर्घटना होण्याची व त्यात जीवित, वित्तहानी होण्याची शक्यता लक्षात घेता पावसाळयापूर्वीच नोटिसा बजावून धोक्याचा इशारा देते. बंजारा तांडा वस्तीला पालिकेच्या एम पूर्व विभागाने अशी नोटीस दिली होती', अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तीन कुटुंबांची मोठी हानी चेंबूर वाशीनाका दुर्घटनेत तीन कुटुंबांची मोठी हानी झाली आहे. झिमूर कुटुंबातील सूर्यकांत, मीना हे पती पत्नी तसेच त्यांची मुलगी अपेक्षा ठार झाली आहे. तर गोरसे कुटुंबातील पंडित, छाया हे पती पत्नी व त्यांची मुलगी यांनी प्राण गमावले आहेत. पारधे कुटुंबातील शीला ही महिला ठार झाली असून शुभम आणि श्रृती या दोन भावंडांनी जीव गमावला आहे. ठाकूर कुटुंबातील एक महिला आणि दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. वाशीनाका दुर्घटनेतील मृतांची नावे मीना सूर्यकांत झिमूर (४५), पंडित राम गोरसे (५०), शीला गौतम पारधे (४०), शुभम गौतम पारधे (१०), श्रृती गौतम पारधे (१५), मुकेश जयप्रकाश अग्रहारी (२५), जिजाबाई तिवारी (५४), पल्लवी दुपारगडे (४४), खुशी सुभाष ठाकूर (दोन वर्षे), सूर्यकांत रवींद्र झिमूर (४७), उर्मिला ठाकूर (३२), छाया पंडित गोरसे (४७), अपेक्षा सूर्यकांत झिमूर (२०), प्राची पंडित गोरसे (१५), अनोळखी (२६), अनोळखी (२५) जखमींची नावे संजय गायकवाड (४०), विजय खरात (४०), अक्षय सूर्यकांत झिमूर (२६), लक्ष्मी आबाजी गंगावणे (४०) आणि विशाखा गंगावणे (१५) सूर्यनगर विक्रोळी येथील मृतांची नावे अंकित रामनाथ तिवारी (२३), रामनाथ राजनारायण तिवारी (४५), आशिष विश्वकर्मा (१९), प्रिन्स विश्वकर्मा (११), कल्पना जाधव (३५), साहेबराव जाधव (४४), कविता रामनाथ तिवारी (४२) जखमी : राजू दुबे (४०)
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eueKEm
No comments