किरीट सोमय्या यांना झेड सेक्युरिटी; केंद्राचं महत्त्वाचं पाऊल
मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीचे नेते व मंत्र्यांची गैरव्यवहाराची प्रकरणं बाहेर काढून कारवाईसाठी पाठपुरावा करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारनं झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) ४० जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. () गेल्या दोन वर्षांपासून किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करत आहेत. राज्यातील मंत्री व महाविकास आघाडीच्या खासदारांशी संबंधित संस्थांचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आणत आहेत. त्यांच्याविरोधात तक्रारी करून कारवाईची मागणी करत आहेत. काही दिवसांपूर्वीत सोमय्या यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या दापोली येथील बंगल्याचं अनधिकृत बांधकाम पाडावं लागलं होतं. अनिल परब यांच्या बंगल्याविषयी देखील सोमय्यांनी तक्रार केली आहे. त्याशिवाय, खासदार भावना गवळी यांच्यावरही त्यांनी घोटाळ्याचे आरोप केले आहेत. याच प्रकरणात वाशिम इथं त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्नही झाला होता. अलीकडंच त्यांनी आघाडी सरकारमधील ११ नेत्यांच्या नावांची यादी जाहीर करत त्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. तेव्हापासून आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसंच, केंद्र सरकारकडं सुरक्षेची मागणी केली होती. सोमय्यांची ही मागणी केंद्र सरकारनं मान्य केली असून त्यांना थेट झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे. सीआयएसएफचे ४० जवान अहोरात्र सोमय्यांच्या सुरक्षेत असणार आहेत. सोमय्यांच्या मुंबईतील घराबाहेर सुरक्षा रक्षकांची सोय करण्यात आली आहे. तात्काळ सुरक्षा पुरवून केंद्र सरकारनं एक प्रकारे सोमय्या यांना 'गो अहेड' असा संदेशच दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हेही वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DZzfno
No comments