ads

Breaking News

अत्याचाराच्या घटनेत सहायक पोलीस निरीक्षकाने घेतली लाच, आरोपी सोडून देण्यासाठी मोजले...

सांगली : मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकास २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. समाधान वसंत बिले (वय ४२) असे त्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयितास मदत करण्याच्या अमिषाने बिले याने लाच मागितली होती. त्याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली होती. त्या तक्रारीवरून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी चौकशीची प्रक्रिया सुरू होती. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान बिले यांनी संबंधित संशयिताला या गुन्ह्यातून बाहेर काढू, असे सांगितले. गुन्हा दाखल करत नाही, असे म्हणत मोठ्या रकमेच्या लाचेची मागणी केली. संशयिताची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याने पैसे देण्यास नकार दिला. अखेर चर्चेअंती तडजोड होऊन २५ हजार रुपये बिले यांना देण्याचे ठरले. याबाबतची तक्रार संशयिताने लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे २७ ऑगस्ट रोजी केली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. बिले यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बुधवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाईसाठी सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी पोलीस अधिकारी बिले याला मिरजेतील हिरा हॉटेल परिसरात बोलावण्यात आले. याठिकाणी लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस अधिकाऱ्यास रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या फिर्यादीनुसार लाचखोर पोलीस अधिकारी बिले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिले याच्या घराची झडती घेतली असून, अधिक तपास सुरू आहे. गंभीर गुन्ह्यात संशयिताला मदत करण्यासाठी बिले याने मोठ्या रकमेची मागणी केली होती. संशयितांना वाचवण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानेच लाच घेतल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3A0qYgE

No comments