ads

Breaking News

मोठी बातमी! मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी भूखंड देण्यास शिवसेना राजी

म. टा. प्रतिनिधी, ठाणे मुंबई-अहमदाबाद दरम्यान उभारण्यात येणाऱ्या हायस्पीड रेल्वे अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे महापालिकेच्या मालकीचा ३ हजार ८४९ चौ. मीटरचा भूखंड देण्यास सर्वसाधारण सभेकडून चर्चेविना मंजुरी देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून रोखून धरलेला हा प्रकल्प शिवसेनेने प्रतिष्ठेचा करत प्रकल्पाचा मार्ग रोखून धरला होता. डिसेंबर, २०२० रोजी हा प्रस्ताव दप्तरबंद करण्याचे निर्देश महापौरांनी दिले होते. परंतु राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून हा प्रस्ताव मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आल्याने तसेच प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रशासनाला हा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिल्याने अखेर बुधवारच्या सर्वसाधारण सभेमध्ये या प्रस्तावाला चर्चेविना मंजुरी दिली. यामुळे प्रकल्पाच्या मार्गातील प्रमुख अडथळा दूर झाला असून, शिवसेनेच्या भूमिकेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईतील रेल्वेच्या लोकल सेवांना पुरेशा सुविधा उपलब्ध होत नसताना दुसरीकडे केंद्र सरकारकडून मुंबई-अहमदाबाद बुलेट प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांकडून बुलेट प्रकल्पाला सन २०१९मध्ये तीव्र विरोध सुरू झाला होता. ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या या भूमिकेला पाठिंबा मिळाला व ठाणे महापालिकेची जमीन या प्रकल्पास देण्यास विरोधाची भूमिका घेण्यात आली. त्यामुळेच प्रशासनाकडून सातत्याने येणाऱ्या भूसंपादनाच्या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेनेकडून अमान्य करण्यात आला. सन २०२०मध्ये राज्यात सत्तांतर होऊन सत्तेत आल्यानंतरही ठाण्यातील बुलेटच्या भूसंपादनाला विरोध दर्शवण्यात आला होता. त्यानंतर मुंबई 'मेट्रो' कारशेडच्या जागेवरून केंद्र आणि राज्यामध्ये उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेकडून बुलेट प्रकल्पाची कोंडी करण्याची भूमिका घेण्यात आली. करोना काळातही दोन ते तीन वेळा प्रशासनाकडून हा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता. अखेर डिसेंबर, २०२०मध्ये मेट्रो वादाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हा प्रस्ताव थेट दप्तरबंद झाला. पण गेल्या वर्षी राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून ठाणे महापालिकेच्या बुलेट ट्रेन भूसंपादन प्रस्तावाच्या मंजुरीचे निर्देश देण्यात आले होते. 'म्हातर्डी'तील स्थानकाचा मार्ग मोकळा ठाणे महापालिकेच्या मालकीची शिळफाटा येथील ३ हजार ८४९ चौ. मीटर जमीन ६ कोटी ९२ लाख ८२ हजार रुपये मोबदल्यात हस्तांतरीत करण्यात येणार आहे. म्हातर्डीकडे जाण्यासाठी हे क्षेत्र महत्त्वपूर्ण असल्याने बुलेटच्या म्हातर्डी येथील ठाणे स्थानकाचा मार्ग मोकळा झाला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hi0VKO

No comments