narayan rane criticised uddhav thackeray : नारायण राणेंनी केली मोठी घोषणा, पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं टीकेचं लक्ष्य
नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री यांची जनआशीर्वाद यात्रा, राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेलं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर त्यांची झालेली अटक यावरून महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी वातावरण तापलं होतं. शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले होते. आता दिल्लीत आज नारायण राणेंनी एक मोठी घोषणा केली. या ही घोषणा खासकरून कोकणासाठी आहे. आता या घोषणेनंतर कोकणात पुन्हा राणे विरुद्ध शिवसेना असं राजकारण पुन्हा रंगण्याची चिन्ह आहेत. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलं आहे. हे विमानतळ बांधून तयार आहे. आता या विमानतळाचं उद्घाटन येत्या ९ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वाजता होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याहस्ते या विमातळाचं उद्घाटन केलं जाईल, अशी घोषणा नारायण राणे यांनी केली. चिपी विमानतळ हे २०१४ मध्ये बांधून तयार केलं आहे. सिंधुदुर्गातील मी स्थानिक आहे. निलेश राणे आणि नितेश राणे स्थानिक आहेत. आम्ही स्थानिक असल्यामुळे आणि आम्हीच विमानतळ बांधल्यामुळे उद्घाटनाचा अधिकारही आमचा आहे. यामुळे कुणीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला नारायण राणे यांनी शिवसेनाला लगावला. येत्या ७ ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरील विमान वाहतूक सुरू होईल, असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ५ सप्टेंबरला सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंना बोलवणार का? चिपी विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोलवणार का? असा प्रश्न नारायण राणेंना करण्यात आला. यावेळी त्यांनी थेट बोलणं टाळत शिवसेनेवर निशाणा साधला. विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना बोलवलचं पाहिजे, असं काही नाही. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे येणार आहेत. यामुळे मुख्यमंत्री असायलाच हवेत असं नाही, असं नारायण राणे म्हणाले. कोकणाला वादळ, अतिवृष्टीचा तडाखा बसला. पण काहीही मदत दिलेली नाही. शिवसेनेनं कोकणात एकही मोठा प्रकल्प राबवला नाही. सर्व पायाभूत सुविधांची कामं बंद आहेत. गेल्या अडीच वर्षांत एकही विकासकाम सुरू झालेलं नाही, असा टोला नारायण राणेंनी शिवसेनेला लगावला. शिवसेनेचे खासदार हे कलेक्शन मास्टर असल्याचा आरोपही राणेंनी केला. फक्त महाराष्ट्रातच करोनाची तिसरी लाट का? राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा हिंदुंच्या सणांवेळी निर्बंध का? माझ्या घरावर दगडफेक करण्यासाठी ५०० लोकं एकत्र आली. त्यावेळी बंदी का नाही घातली? घरावर दगडफेक करणाऱ्यांचा सत्कार मुख्यमंत्री करतात, हे कोणत्या विचारसरणीचे मुख्यमंत्री आहेत? असा सवाल करत राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगवाला. महाराष्ट्रातील सरकार जनतेला करोनाची भीती दाखवत आहेत. तिसरी लाट फक्त महाराष्ट्रातच आहे का इतर राज्यात नाही? आणि निर्बंध घालूनही महाराष्ट्रात लाखो नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला. करोनाचा संसर्ग रोखण्यात आणि परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे, असं म्हणत नारायण राणेंनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला लक्ष्य केलं.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l1mRef
No comments