supreme court : मंदिराच्या संपत्तीवर देवतांचा मालकी हक्क, पुजारी फक्त व्यवस्थापकः सुप्रीम कोर्ट
नवी दिल्लीः पुजारी हा मंदिराच्या जमिनीचा मालक असू शकत नाही, तर मंदिराशी संबंधित जमिनीचे मालक हे देवी-देवता आहेत, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. पुजारी फक्त मंदिराच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनाच्या उद्देशाने जमिनीशी संबंधित काम करू शकतो. यामुळे मंदिराच्या जमिनीची मालकी हक्कात फक्त देवतेचं नाव लिहिवं. कारण देवता न्यायिक व्यक्ती असल्याने जमिनीचे मालक आहेत. जमिनीवर देवतेचाच ताबा असतो. देवतेचे काम हे सेवक किंवा व्यवस्थापनाद्वारे केले जाते. यामुळे व्यवस्थापक किंवा पुजाऱ्याच्या नावाचा उल्लेख मंदिराच्या जमिनीच्या मालकी हक्कात करण्याची आवश्यता नाही, असं सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि ए. एस. बोपन्ना यांच्या पीठाने म्हटलं. 'पुजारी फक्त देवतेच्या मालमत्तेचे व्यवस्थाप करण्यास उत्तरदायी' पुजारी किंवा सरकारी पट्टेदार हा महसूल भरण्यापासून मुक्त असलेल्या जमिनीचा एक सामान्य भाडेकरू नाही. त्याला फक्त धर्मादाय विभागाकडून अशा जमिनीच्या फक्त व्यवस्थापनाच्या उद्देशाने ठेवले जाते. पुजारी फक्त देवतेच्या संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी उत्तरदायी आहे. पुजारी हा मंदिरात पूजा-आरती आणि जमिनीच्या व्यवस्थापनासंबंधित काम करण्यास अपयशी ठरला, तर त्याला बदलताही येऊ शकते. यामुळे त्याला मंदिराच्या जमिनीचा मालक मानता येऊ शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने स्पष्ट केलं. 'जिल्हाधिकारी मंदिराच्या संपत्तीचे व्यवस्थापक नाही' कुठल्याही महसूल नोंदीत पुजारी किंवा व्यवस्थापकाच्या नावाचा उल्लेख असल्याचा कोणताही निर्णय आम्हाला दिसत नाही, असं खंडपीठने म्हटलं. जिल्हा दंडाधिकाऱ्यांना मंदिराच्या मालमत्तेचे व्यवस्थापक मानले जाऊ शकत नाही, कारण त्यावर देवतांचा मालकी हक्क आहे. जर मंदिर राज्याशी संबंधित नसेल, तर जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सर्व मंदिरांचे व्यवस्थापक बनवता येणार नाही, असं खंडपीठाने म्हटलं. मध्य प्रदेश हायकोर्टाच्या एका आदेशाविरोधात राज्य सरकारने केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. राज्य सरकारने एमपी लॉ रेव्हेन्यू कायद्या, १९५९ नुसार दोन परिपत्रकं जारी करण्यात आले होते. ही परिपत्रकं मध्य प्रदेश हायकोर्टाने रद्द केली आहेत. मंदिराच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी महसूल नोंदणीमधून पुजाऱ्याचे नाव काढून टाकण्याचे आदेश या परिपत्रकांमधून देण्यात आले होते.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WUbflf
No comments