कोल्हापुरात दहशत माजवणाऱ्या 'या' कुख्यात गँगवर 'मोक्का'ची कारवाई
: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, गर्दी, हाणामारी, हत्यारे बाळगून दहशत माजवणे असे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या आर.सी. गँगला पोलिसांनी मोक्का लावला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मोक्काच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या टोळीच्या दहशतीमुळे शहरातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक हतबल झाले होते. आर.सी. गँगचा म्होरक्या रवी सुरेश शिंदे, प्रदीप रामचंद्र कदम, संदीप मोतीराम गायकवाड, जावेन इब्राहिम सय्यद, सागर सुरेश जाधव, प्रकाश कुबेर कांबळे, अक्षय ऊर्फ आकाश अशोक कदम, अजय सुनील माने, योगेश मानसिंग पाटील, विकी माटुंगे (सर्व रा. जवाहरनगर) यांच्यावर कारवाई झाली आहे. या टोळीवर गंभीर स्वरूपाचे ३७ आणि अदखलपात्र ८ गुन्हे दाखल आहेत. शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत खंडणी उकळणे, सुपारी किंग, भूखंड माफिया म्हणून आर.सी. गँगने वर्चस्व निर्माण केले. तसंच मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ उठवण्याचा प्रयत्न केला आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी मोक्काचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे पाठवला होता. दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी मोक्काच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करून हा प्रस्ताव मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठवला आणि त्यांनी शुक्रवारी रात्री प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bsJWSu
No comments