यात्रेसाठी चालत जाणाऱ्या भाविकांना कारने चिरडले; ३ जागीच ठार
: हुलजंती (ता. मंगळवेढा) येथे महालिंगराया यात्रेसाठी चालत जाणाऱ्या भाविकांना एका चारचाकी गाडीने धडक दिल्याने तिघे जागीच ठार झाले आहेत. अपघातात ठार झालेले तिघेही कर्नाटकातील रहिवासी आहेत. बसवराज उर्फ बसाप्पा दुर्गाप्पा चिंचवडे (वय ३२, रा. यदभावी ता. लिंगसूर), नागप्पा सोमाण्णा अचनाळ (वय ३४) आणि म्हानाप्पा दुर्गप्पा गोंदीकल (वय ४०, दोघे रा. देवभुसर ता. लिंगसूर जि. रायचूर) अशी ठार झालेल्या भाविकांची नावे आहेत. हा अपघात उमदी-मंगळवेढा रस्त्यावर शनिवारी सायंकाळी सहा वाजता झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, हुलजंती येथे महालिंगराया व बिरोबा गुरू शिष्य भेटीचा पालखी सोहळा आठवडाभर सुरू असतो. या पालखी सोहळ्यासाठी , आंध्रप्रदेश, तेलंगणा, गोव्यासह इतर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने जात असतात. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कर्नाटकमधून उमदी यामार्गे हुलजंतीला भक्त जात होते. दरम्यान, पुण्याहून रायचूरला जाणाऱ्या एका चार चाकी गाडीचे टायर फुटले. टायर फुटल्याने कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याने चालत जाणाऱ्या बसवराज उर्फ बसाप्पा दुर्गाप्पा चिंचवडे, नागप्पा सोमांना अचनाळ व म्हानाप्पा दुर्गप्पा गोंदीकल या भक्तांना चिरडले. यात जागीच तिघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31idtg3
No comments