ads

Breaking News

अरारा खतरनाक! पिंपरीतील स्वयंघोषित भाईला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; धिंडही काढली

पिंपरी : ‘आमची सूत्रे येरवडा जेलमधून फिरतात,’ असं म्हणत कोयता हातात घेऊन व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या स्वयंघोषित भाईला गुंडा विरोधी पथकाने चांगलाच दणका दिला आहे. व्हिडिओ व्हायरल करत दहशत निर्माण करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मयूर अनिल सरोदे ऊर्फ यमभाई (वय २१, रा. दुर्गानगर, निगडी-भोसरी रोड, आकुर्डी) असं या आरोपीचं नाव आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाविरोधात चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काढली धिंड सोशल मीडियावर स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणाला अटक केल्यानंतर गुरुवारी (१५ जुलै) पोलिसांनी त्याची धिंड काढली. मयूर याने सोशल मीडियावर हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन पोस्ट अपलोड केल्या होत्या. त्यामध्ये त्याने कोयता दाखवून दहशत निर्माण केली होती. तर तिसऱ्या पोस्टमध्ये त्याने ‘आमची सूत्र येरवडा जेलमधून हालतात', असे म्हणत थेट पोलिसांनाच आव्हान दिले होते. याबाबत गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने यांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्याची तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती काढली आणि त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर याच्यावर यापूर्वी गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, पोलिसांनी तपासाकरिता आरोपी सरोदे याला तो राहत असलेल्या दुर्गानगर परिसरातून हातात बेड्या घालून फिरविले. आरोपी सरोदे याची परिसरात दहशत असल्याने नागरिक घरातूनच त्याची पोलिसांनी काढलेली ही धिंड पाहात होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3el81MW

No comments