धीरज घाटेंच्या हत्येसाठी आरोपी १५ दिवस प्रयत्न करत होते, पण...
म. टा. प्रतिनिधी, भाजपचे नगरसेवक धीरज घाटेंच्या हत्येसाठी आरोपी गेल्या १५ दिवसांपासून प्रयत्नात होते. मात्र, घाटे यांच्यासोबत सतत कोणी ना कोणी असल्याने आरोपींना त्यांच्यावर हल्ला करता आला नाही, अशी धक्कादायक माहिती पोलिस तापासात समोर आली आहे. तसेच, 'घाटे हे आमच्या जिवावरच मोठे झाले आणि आता आम्हाला विचारत नाहीत,' या रागातून आरोपींनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याचेही समोर आले आहे. विकी ऊर्फ वितुल वामन क्षीरसागर (वय ३३), मनोज संभाजी पाटोळे (वय ३३, दोघेही रा. साने गुरुजी वसाहत, नवी पेठ) आणि महेश इंद्रजित आगलावे (वय २५, रा. लोहियानगर) यांना अटक केली आहे. नवी पेठेतील सॅफ्रॉन हॉटेलमध्ये गेल्या शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला होता. घाटे हे सॅफ्रॉन हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना तीन व्यक्ती काळी बॅग घेऊन हॉटेलमध्ये आल्याचे दिसले. त्या व्यक्ती घाटेंकडे सतत पाहत होत्या. त्यांनी सहकाऱ्यांकडे चौकशी केली. त्या वेळी त्यांचा जुना कार्यकर्ता विकी क्षीरसागर व मनोज पाटोळे यांच्याशी ते काही तरी बोलत असल्याचे समजले. तसेच, त्यांच्याकडे शस्त्र असल्याचेही समजले. त्यामुळे घाटे त्या ठिकाणावरून निघून गेले. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन, आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तिघांकडे तपास केला असता, त्यांनी खुनाचा कट रचल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून विकी आणि इतर आरोपी घाटे यांच्यावर पाळत ठेवून होते. दरम्यान, राहुल शेडगे आणि निखिल मोहिते या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी यांच्या खुनाचा कट केल्याप्रकरणी न्यायालयाने तिघा आरोपींना शुक्रवारपर्यंत (१० सप्टेंबर) पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी कोणाच्या सांगण्यावरून गुन्ह्याचा कट रचला, अटक आरोपींव्यतिरीक्त अजून कोणी सूत्रधार आहे का, आरोपींजवळ असलेल्या काळ्या बँगमध्ये काय होते, याचा तपास करण्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील वर्षा आसलेकर यांनी केला होता. तर, आरोपींची बाजू ॲड. विजयसिंह ठोबरे, ॲड. हितेश सोनार आणि ॲड. दिग्विजय ठोंबरे यांनी मांडली. संबंधित गुन्हा हा खोटा व बनावट आहेअसून, आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन तो दाखल करण्यात आला आहे, असा युक्तिवाद ॲड. ठोंबरे यांनी केला. गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक अभय महाजन तपास करत आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tp53gE
No comments